एका शतकाच्या अथक
परिश्रमांनी नावाररूपाला आलेलं, सहस्रावधी शिल्पकारांच्या योगादानाची समृद्धी
लाभलेलं, तरीही काही अंशी अपूर्ण असं ते शिल्प त्या त्रिशूळधारी राक्षसाने पायदळी
तुडवलं. शिल्पाच्या सुरेख मस्तकाचा क्षणार्धात चेंदामेंदा झला आणि चिखल मिश्रित रक्ताच्या
थारोळ्यात निपचित जाऊन ते पडलं. त्याने फोडलेली किंकाळी केशरी वस्त्र परिधान केलेल्या
गदाधारी जमावाच्या कोलाहलात विरून गेली. निमिषार्धात ती जनावरं त्याच्यावर तुटून
पडली. शिल्पातून चहुदिशांना दरवळणारा, मंत्रमुघ्द करून टाकणारा तो सुगंध, त्या कृत्रिम, निर्जीव कालाकृतीलाही जिवंतपणाची झाक देणारा तो सौम्य, ऊबदार प्रकाश
नाहीसा झाला. राहिला फक्त भकास धुराचा वास, स्मशानातली निरव शांतता आणि काचेच्या
तावदानापलीकडून ते केविलवाणं दृष्य पाहत असलेल्या (माझ्यासारख्या) पोकळ बाहुल्या.