Saturday 31 May 2014

माझे शहर



दुर्गम, निर्जन, सुंदर परि तू सात मण्यांची माला
हुंडा तुज रूपी मिळता येथे राजपुत्र तो आला

वसाहतींनी बंड घोषले, खंडित हो व्यापारी
बंदर उत्तम झाले विकसित तुझ्याच पूर्व किनारी

द्वीप सातही एकच होता सूरत बदलून गेली
लोहमार्ग अन विशाल गिरण्या, भरभराटही झाली

जाती-धर्मही विरून गेले, येथे वसती भाई
मिळून-मिसळून श्रमती, झटती, कष्टकरी ते आई

जन्म पावली उदरी तुझिया राष्ट्रसभा  ही थोर
श्रावणक्रांती तुझ्याच दारी पसरी रुधिर तुषार

परंतु आता हिंस्र श्वापदे जन्मली येथे काही
विष ओकुनि फूट पाडती, सजा तयांना नाही

भगवे झेंडे, खाकी चड्डी, हिंसा यांचे सूत्र
भाषा-धर्म त्यांचे चाकर, हे भूमीचे पुत्र

दारिद्र्याला उरे न सीमा, कुणा न पर्वा याची
मजल्यांवरती मजले चढले, सत्ता धनाधीशांची

शतकांचा हा प्रवास तुझा दिशेस कुठल्या जाई?
समानता अन बांधिलकी की विनाशमार्गी आई?       

No comments:

Post a Comment