दीपस्तंभ
पाऊसधारा, पिसाट वारा; कोसळल्या त्या उल्का-गारा
दुर्गम, निर्जन बेटावरती मीच बांधली माझी कारा
काळा कातळ, पोलादी गज, गस्त घालती क्रूर निशाचर
रातकिड्यांची अखंड संगत, तेजहीन तो लुप्त दिवाकर
धडपडलो अन, लढलो, रडलो, आर्त स्वरांचे गीत गायलो
रक्ताळल्या त्या भिंतींवरती धडक मारुनी मी कोसळलो
कुणी न साथी कुणी न वाली, हाक कुणाच्या पडे न कानी
प्रयत्न शिणले, आशा थकली, तडफडण्याने आली ग्लानी
स्थलकालाचे भान हरपले, घड्याळ माझे पार बिघडले
फक्त रिकाम्या या हृदयातिल उदासवाणे ठोके उरले
रात्रीच्या त्या नीरवतेचा भंग अचानक क्षणात झाला
लखलखणारा प्रकाशझोत तो कुरवाळुनिया मजला गेला
कणा-कणाचे रूप बदलले, कोठडीतही वैभव वसले
उरात माझ्या कोंब नवेले नकळत आशेचे अवतरले
गजांपलिकडे समुद्र काळा, चमचमता सोनेरी होता
चौफेर जगाला नाहू घालत दीपस्तंभ तेजाने अपुल्या
अर्थ देत जगण्याला माझ्या क्षितिजावरती तळपत होता
No comments:
Post a Comment